धर्माबाद (प्रतिनिधी)- धर्माबाद शहरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी एका नागरिकास अडवून मारहाण करत त्याच्याकडील १८ हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना १२ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान शेख महेबूब (वय ३५, रा. तेलंगी, ता. तरोडा मंडळ, जि. निर्मल) हे धानोरा ते करखेली जाणाऱ्या रस्त्याने जात असताना दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील १८ हजार रुपये रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
या घटनेनंतर पीडिताने धर्माबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुथ्येपोड करीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
