नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी वांगी गावाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना वांगी गावाजवळील मोकळ्या जागेत काही जण पैशांची हार-जीत लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून आठ जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून ४,९५० रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दोन मोबाईल फोन (किंमत ४० हजार रुपये) आणि पाच मोटारसायकली (किंमत ४ लाख ६० हजार रुपये) असा एकूण ५,०४,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यात अवैध जुगार, मटका, दारू, अमली पदार्थ व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 744 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बेकायदा रेती वाहतुकीवर सोनखेड पोलिसांची कारवाई; ४५.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त टाटा इंडिगो कारसह २.२३ लाखांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त; मरखेल पोलिसांची धडक कारवाई