नांदेड (प्रतिनिधी)- सोमवार, 13 जुलै 2026 च्या मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पोलिसाला घटनास्थळी सोबत आणले होते आणि त्याच्या समोरच हे निर्घृण हत्याकांड घडले.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे २:३० वाजताच्या सुमारास सुभाष केळकर, अविनाश ऊर्फ बाटल्या साहेबराव इंगोले (३१) आणि शैलेश ऊर्फ दांड्या यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले होते. या वादानंतर आरोपी अविनाश इंगोले हा बस स्थानकात तैनात असलेल्या नाईट ड्युटी पोलिसाला तक्रार करण्यासाठी किंवा मध्यस्थीसाठी सोबत घेऊन आला. मात्र, पोलिसाच्या उपस्थितीतच आरोपीने रागाच्या भरात सागर सुभाष केळकर (वय १७) याच्या पोटात आणि तोंडावर चाकूने अनेक वार केले.
या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर केळकरचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ३० वर्षीय अविनाश इंगोले आणि २३ वर्षीय शैलेश या दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.या बाबत संगीता केळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरवस्तीत आणि सुरक्षा रक्षकाच्या (पोलिसाच्या) समोरच एका अल्पवयीन मुलाचा असा निर्घृण खून झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून समाज कोणत्या दिशेला चालला आहे, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
