नांदेड- शहरात ज्येष्ठ व नवोदित कवी कवयित्रींच्या सहभागाने कविसंमेलन संपन्न झाले. दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून शहर व जिल्हा परिसरात काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मास्तर आवगो रे या पुस्तकाचे विमोचन आणि काव्यपौर्णिमा-१०९ या कविसंमेलनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक विमोचनानंतर कविसंमेलनात सहभागी कवी कवयित्री यांनी पाऊस, कविता आणि विद्रोहाचा जागर घडवून आणला. यावेळी ऍड. संजय भारदे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुरेखा महादसवाड, गोंडरकार अशोक कुबडे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, मंडळाचे राज्य समन्वयक कवी बाबुराव पाईकराव, स्तंभलेखक तथा विद्रोही कवी मारोती कदम, आम्रपाली मादळे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे तसेच नवोदित कवी कवयित्री यांची उपस्थिती होती.
अधिक मास ज्येष्ठ पौर्णिमा अधिक काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे करण्यात आले होते. म. फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. पहिल्या सत्रात लेखक मारोती भु. कदम लिखित बालकथासंग्रह ‘मास्तर आवगो रे’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक तथा पिरिपाचे प्रदेश सरचिटणीस बापुराव गजभारे, डॉ. संतोष सेलुकर, प्रा. गोविंद बैलके, बालाजी थोटवे, अनिल हंकारे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या काव्यपौर्णिमा-१०९ कार्यक्रमात विद्रोही कवी अॅड. संजय भारदे यांच्या अध्यक्षतेखाली अतिथी कवी अशोक कुबडे, कवयित्री सुरेखा महादसवाड यांच्या उपस्थितीत गझलकार चंद्रकांत कदम, डी. एन. मोरे खैरकेकर, मारोती कदम, प्रज्ञाधर ढवळे, आदर्श खिल्लारे, अनुरत्न वाघमारे यांनी सहभाग नोंदविला. काव्यपौर्णिमेचे सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार मारोती कदम यांनी मानले.
