नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने सोमवारी विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे घाट पूल परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वजीराबाद चौक, तिरंगा चौक आणि गोवर्धन घाट या प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, आरसीपी पथक तसेच नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे पथक सहभागी झाले होते. मोहीमेदरम्यान रस्त्यावरील हातगाड्या, फळविक्रेते, टपऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे इतर अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत एकूण ६४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल असे अतिक्रमण किंवा अवैध पार्किंग करू नये. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 775 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या; वंदे भारत स्लिपर मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण ६४ वाहनचालकांवर कारवाई; ₹५४ हजारांचा दंड