नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढत चाललेले अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक शाखेने सोमवारी विशेष अतिक्रमण निर्मूलन व वाहतूक नियमन मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी, आरसीपी पथक तसेच नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या पथकाने सहभाग घेतला. रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वजीराबाद चौक, तिरंगा चौक आणि गोवर्धन घाट पुल परिसरातील प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान रस्त्यांवरील हातगाड्या, फळविक्रेते, टपऱ्या तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी अन्य अतिक्रमणे हटविण्यात आली. याशिवाय चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण ६४ प्रकरणे नोंदवून ₹५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, रस्त्यांवर अतिक्रमण करू नये, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करू नयेत आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 711 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये अतिक्रमण व अवैध पार्किंगविरोधात विशेष मोहीम; ६४ वाहनचालकांवर कारवाई, ५४ हजारांचा दंड सावधान! राम मंदिर ट्रस्टच्या पैशांचा मनी ट्रेल काय सांगतो? खळबळजनक खुलासा!