जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार: ललित गांधी

महामंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई (प्रतिनिधी)-  जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राज्यात मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर, कोल्हापूर  एकूण सात ठिकाणी वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.

यावेळी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज व व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपास मान्यता देण्यात आली. तसेच ‘विहारधाम निर्माण योजना’ आणि ‘पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना’ राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व या संदर्भात राज्यभराचे सर्वेक्षण त्वरित पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळ (NMDFC) कडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारणीसंदर्भात प्राप्त मागण्यांवर चर्चा करून राज्यात मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर, कोल्हापूर या सात ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय, ‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) व इतर रोजगाराभिमुख योजनांचा जैन युवकांना लाभ मिळावा यासाठी उद्योग विभागाच्या सहकार्याने विशेष अभियान राबविणे, तसेच महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने महिला बचत गटांसाठी विविध योजना राबविण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.

महिलांना कुटीर उद्योगासाठी १० हजार ते १ लाख पर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याच्या योजनेची अंमलबजावणी त्वरित सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येवून येत्या पंधरावड्यात याचे अर्ज वितरीत केले जातील असे ललित गांधी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या विविध योजनांमध्ये जैन समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी समाजातील प्रमुख व्यक्तींना योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी विशेष बैठका आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी नवी दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य करारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबद्दल समन्वयक संदीप भंडारी यांनी अध्यक्षांच्या कार्याचा गौरव करत अभिनंदनाचा ठराव मांडला. हा ठराव उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर करून अध्यक्षांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

बैठकीसाठी  सचिव  माधवी खोडे-चवरे,

व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे, महिला बालविकास अधिकरी गौरी दोंदे, वित्त विभागाच्या अधिकारी रचना दरेकर, कौशल्य विकास विभागाचे आनंद माळी, समन्वयक संदीप भंडारी, महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी तसेच विकास अच्छा, अमित जैन, दर्शना जैन, विश्वजीत कोल्हापुरे, प्रशांत गौडाजे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!