एकल महिला धोरण ठरविण्यासाठी लवकरात लवकर अभिप्राय नोंदवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

नांदेड –  राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत असून हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित व्हावे यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपले अभिप्राय, सूचना आणि प्रस्ताव लवकरात लवकर नोंदवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आज एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित घटक सहभागी झाले होते.

या प्रसंगी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. बी. गिरी, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र आणि परिणामकारक धोरण तयार करण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार महिला व बाल विकास मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मसुदा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत राज्यभरातून सूचना आणि अभिप्राय संकलित करून अंतिम धोरण निश्चित केले जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती आणि संबंधित विभाग यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. नांदेड येथे आयोजित कार्यशाळेतही उपस्थितांकडून विविध मुद्द्यांवर अभिप्राय नोंदवून घेण्यात आला.

कार्यशाळेत बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यात एकल महिलांचा सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यात अशा महिलांची संख्या 99 हजार 789 इतकी आहे. या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणे आवश्यक आहे.

त्यासाठी माविम, उमेद आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करावे, तसेच या उपक्रमात महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. एकल महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संबंधित विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेदरम्यान विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकल महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी आणि गरजा याविषयी मते मांडली. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी उपस्थितांना आवाहन करताना सांगितले की, केवळ समस्या मांडण्याऐवजी त्यावर उपाययोजना, नवीन योजना आणि धोरणात्मक सूचना देखील पाठवाव्यात. नागरिकांकडून येणारे अभिप्राय हे एकल महिला धोरण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

यासाठी नागरिकांनी आपले अभिप्राय आणि सूचना व्हॉट्सअॅप क्रमांक 8208589195 वर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!