नांदेड – जुन्या भांडणाच्या कारणावरून घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करणे आणि तरुणीचा विनयभंग केल्याच्या गंभीर प्रकरणात नांदेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय-१ चे न्यायाधीश आर. व्ही. कोकरे यांनी चारही आरोपींना दोषी ठरवून विविध कलमांखाली कमाल तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. घटनेची पार्श्वभूमी: ही घटना १७ मे २०१९ रोजी घडली होती. पीडित तक्रारदार तरुणी आणि तिचे आजी-आजोबा घरात असताना, शेजारी राहणारे राजू गोविंद आडे, त्याची पत्नी लताबाई राजू आडे, मुलगा विशाल राजू आडे आणि मेहुणा राजा ऊर्फ राजेश देवराव जाधव यांनी तुम्ही आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार का देता? या कारणावरून पीडितेच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. यावेळी आरोपींनी पीडितेच्या आजी-आजोबांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडिता त्यांना सोडवण्यासाठी गेली असता, आरोपी विशाल राजू आडे याने तिचा हात धरून स्वतःकडे ओढले व तिचा विनयभंग करून अश्लील वर्तन केले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. न्यायालयाचा निकाल आणि शिक्षा: सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍड.रणजीत देशमुख यांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि ५ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली.. १. सर्व आरोपी (लताबाई आडे, राजा ऊर्फ राजेश जाधव, राजू आडे आणि विशाल आडे): भारतीय दंड संहिता कलम ४५२ (घरात बेकायदेशीर प्रवेश) सह ३४ अन्वये: प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड. भारतीय दंड संहिता कलम ३२३ (मारहाण) सह ३४ अन्वये: प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड. २. मुख्य आरोपी विशाल राजू आडे यास अतिरिक्त शिक्षा: कलम ३५४ अन्वये: ३ वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड. कलम ३५४-(ए) अन्वये: ३ वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड. आरोपींकडून वसूल केलेली दंडाची सर्व रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.आरोपी राजू विशाल आडे यास दिलेल्या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. तपास पथक: या प्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फसके यांनी केला होता. तसेच पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र न्यायालय कोर्ट पैरवी नोडल ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक नईम खान आणि विमानतळ पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवी कर्मचारी डी. व्ही. विभुते यांनी न्यायालयीन कामकाजात चोख भूमिका बजावली. Kanthak Suryatal Post Views: 1,184 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिंगोलीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद; १३ तक्रारदारांच्या समस्या ऐकून तत्काळ कार्यवाहीचे निर्देश माजी नगरसेवक नरसिंगराव पावडे यांचे निधन’ऍड. निलेश पावडे यांना पितृयोग