जशी करणी तशी भरणी आणि सत्यमेव जयते या भारतीय संस्कृतीतील कालातीत मूल्यांना आपल्या कार्यातून न्याय देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार. पोलीस दलात काम करणे म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर समाजाच्या सुख-दुःखाशी एकरूप होऊन न्याय, सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करणे होय. या अर्थाने संजय नीलपत्रेवार यांचे कार्य हे खऱ्या अर्थाने लोकसेवेचे आदर्श उदाहरण ठरते.
नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद, कुंटूर, माळाकोळी आणि उस्माननगर या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी आपल्या सेवाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावली. या काळात तीन वेळा पोलीस ठाणे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत त्यांनी नेतृत्व, शिस्त आणि धाडस यांचे उत्तम दर्शन घडवले. “धैर्य ज्याचे कवच, त्याला संकटाची भीती नसते” या म्हणीची प्रचिती त्यांच्या कार्यातून वारंवार आली.
वजीराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुख्यात असलेल्या आणि भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या बब्बर खालसा संघटनेशी संबंधित हरविंदरसिंग रिंदा यांच्या वडिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवले. या प्रकरणात ९ रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. तसेच अनेक आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतली. हे कार्य केवळ पोलीस कारवाई नव्हते, तर समाजाच्या सुरक्षेसाठी दिलेला एक मजबूत संदेश होता.

माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मोहिजा-परंडा येथील अवघ्या ९ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा संवेदनशील गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद करण्यात आले. अशा प्रकरणात तपासाची दिशा, वेळेचे भान आणि मानवी संवेदनशीलता या सर्व गोष्टींची कसोटी लागते. संजय नीलपत्रेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आणि जनतेचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला.
जनतेचा विश्वास हीच पोलीस दलाची खरी ताकद हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले. समाजातील पीडित, शोषित आणि वंचित घटकांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. पत्रकारिता आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयातून अनेक प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आले आणि त्यावर योग्य ती कार्यवाही झाली. समाजाचा तिसरा डोळा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांबद्दल त्यांनी नेहमीच आदर व्यक्त केला.
उस्माननगर पोलीस ठाण्यातील त्यांचा कालखंड विशेष उल्लेखनीय ठरला. प्रामाणिकपणा, सचोटी आणि निस्वार्थ सेवाभाव यामुळे त्यांनी अल्पावधीतच जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले. जेथे इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे त्यांनी समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून अनेक विधायक उपक्रम राबवले.
पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज मैदान तसेच अभ्यासिका उभारण्याचा उपक्रम हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचा शहरात जाण्याचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचला. त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली, मेहनतीला योग्य व्यासपीठ मिळाले आणि अपघाताचा धोका टळला. आज अनेक युवक या सुविधेचा लाभ घेत यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्कान अभियान प्रभावीपणे राबवून अंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यात यश आले. हरवलेले आणि पळवून नेलेले ३४ स्त्री-पुरुष शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत करण्यात आले. यासाठी महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सातारा तसेच तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या परराज्यांमध्ये जाऊन विशेष प्रयत्न करण्यात आले.
अवैध धंद्यांविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिका देखील तितकीच कठोर आणि प्रभावी होती. दारू विक्रेते, जुगार अड्डे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध ९५ गुन्हे दाखल करून १३५ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सुमारे ७ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रेती माफियांविरुद्धची कारवाई तर त्यांच्या कार्यकाळातील मैलाचा दगड ठरली. अवैध रेती वाहतूक आणि उत्खननाविरोधात ३२ गुन्हे दाखल करून १०२ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तब्बल २३ कोटी ८३ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. MPDA, तडीपार यांसारख्या कठोर कायदेशीर उपाययोजनांद्वारे अवैध व्यवसायांना लगाम घालण्यात यश मिळाले. काही गावांमध्ये दारूबंदी यशस्वीपणे राबवून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दिली.

आज पुणे ग्रामीण जिल्ह्यातील इंदापूर, दौंड पोलीस स्टेशन तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँच युनिट-२ येथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांची ओळख एक कर्तव्यदक्ष, अभ्यासू, निर्भीड आणि लोकाभिमुख अधिकारी अशीच राहिली आहे.
वृक्ष आपल्या फळांनी ओळखला जातो या म्हणीप्रमाणे संजय नीलपवार यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यातून उजळून दिसते. त्यांची कामगिरी ही केवळ गुन्हे उघडकीस आणण्यापुरती मर्यादित नसून समाजात विश्वास, सुरक्षितता आणि सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणारी आहे.
समाजासाठी झटणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळेच पोलीस दलाबद्दलचा सन्मान वाढतो. त्यांच्या कार्याचा गौरव करताना एवढेच म्हणावेसे वाटते की, कर्तव्याला धर्म मानणारे अधिकारी समाजाचे खरे रक्षक असतात. सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे आणि भविष्यातही त्यांच्या कार्याची सुवर्णपाने समाजाच्या स्मरणात कायम राहतील.
.
