दिनांक २० मे २०२६ रोजी रात्री १० ते २१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके हे बेलतरोडी पोलीस ठाण्यात रात्रपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते. रात्र शांत असली तरी पोलिसांची नजर सतत जागी असते, या उक्तीप्रमाणे ते आपल्या पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करत होते. शंकरपूर मार्गे गोटाळा-पांजरी परिसरात गस्त घालत असताना सिंगापूर सिटी परिसरात काही नागरिक संशयास्पद अवस्थेत उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्याकडे चौकशी केली.
त्यावेळी सुरेंद्र वानखेडे यांनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना सांगितले की, त्यांचा मुलगा ऋषिकेश वानखेडे हा आपल्या पत्नीला बेडरूममध्ये बंद करून अमानुष मारहाण करत आहे. तिच्या अंगातून रक्त वाहत असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. संकटात धावून येणारा तोच खरा मित्र, या म्हणीप्रमाणे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता कारवाई सुरू केली.
सुरेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक ग्रीन सिटी-४, गोटाळा पांजरी येथील ट्यूलिप-२ इमारतीतील पहिल्या मजल्यावरील बी-१०६ या फ्लॅटमध्ये पोहोचले. फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा होता. हॉलमध्ये एक तीन वर्षांचे बालक आणि दोन महिला भयभीत अवस्थेत बसलेल्या होत्या. त्या वेळी घरातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण आणि भीतीदायक झाले होते.
सुरेंद्र वानखेडे यांनी पोलिसांना बेडरूमकडे इशारा करत सांगितले की, आत त्यांचा मुलगा सुनेवर हल्ला करत आहे. पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके तात्काळ त्या बंद दरवाज्याजवळ गेले. त्यांनी दोनदा दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी आवाज देत पोलीस आले आहेत, दार उघडा,असे सांगितले. काही क्षणांतच आतून एका महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू आला.
त्या क्षणी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळ गेली तर जीव जाईल हे लक्षात घेत धाडसी निर्णय घेतला. कोणताही विचार न करता पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके यांनी जोरदार धक्का देत बेडरूमचे दार फोडले. दार उघडताच समोरचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. आरोपी ऋषिकेश वानखेडे याच्या हातात धारदार चाकू होता, तर पीडित महिला जीव वाचवण्यासाठी रक्ताच्या थारोळ्यात इकडे-तिकडे पळत होती. फ्लोअरवर सर्वत्र रक्त सांडलेले दिसत होते.
धाडस असेल तर मृत्यूही मागे हटतो, याचा प्रत्यय याच वेळी आला. पोलिसांनी क्षणार्धात आरोपीवर झडप घातली. पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके यांनी आरोपीला पकडून त्याचे पुढील घातक कृत्य रोखले, तर त्यांच्या सोबत असलेले पोलिस अंमलदार रितेश गोतमारे यांनी आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी विलंब न करता अतिरिक्त स्टाफला पाचारण केले.
जखमी महिला अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे लक्षात येताच तिला तातडीने एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते काही मिनिटांचा उशीर झाला असता तर महिलेचा जीव वाचवणे कठीण झाले असते. देव तारी त्याला कोण मारी, असे जरी म्हटले जात असले तरी त्या रात्री देवदूताचे काम बेलतरोडी पोलिसांनी केले, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनेत पोलिसांनी दाखवलेले धाडस, प्रसंगावधान आणि तत्परता यामुळे एका संभाव्य खुनाचा गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात यश आले. पोलीस जागे तर समाज सुरक्षित, हे वाक्य या कारवाईमुळे अक्षरशः खरे ठरले आहे. रात्रपाळीत केवळ गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीवर त्वरित विश्वास ठेवत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि जीव धोक्यात घालून केलेली कारवाई ही खरोखरच कौतुकास्पद मानली जात आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी केवळ आरोपीला पकडले नाही, तर रक्ताच्या थारोळ्यातून एका महिलेचा जीव वाचवून समाजासमोर मानवतेचे उदाहरण ठेवले. अनेकदा पोलिसांवर टीका केली जाते; मात्र अशा घटनांमुळे पोलिस दलातील संवेदनशील चेहरा समाजासमोर येतो. कर्तव्य हाच धर्म मानून काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळेच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
या संपूर्ण कारवाईबद्दल शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी पोलीस उप निरीक्षक नारायण घोडके आणि पोलीस अंमलदार रितेश गोतमारे यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्या पाठीवर थाप दिली. सोबतच बेलतरोडी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके, पोलिस अंमलदार रितेश गोतमारे आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या धाडसाची दखल घेत त्यांना ब्रेवरी अवॉर्ड मिळावा यासाठी पोलीस महासंचालकांकडे शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळत आहे.
जिथे कायदा थरथरतो तिथे पोलिसांची हिंमत उभी राहते,हे बेलतरोडी पोलिसांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. एका क्षणाचा निर्णय, जीवाची पर्वा न करता घेतलेली धाडसी भूमिका आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणारी पोलिसांची वृत्ती यामुळे आज एका महिलेचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला आहे. त्यामुळे या संपूर्ण कारवाईचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत होत असून बेलतरोडी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
