नांदेड (प्रतिनिधी)- प्रेमाच्या वादातून झालेल्या सक्षम ताटे या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटकेत असलेली महिला आरोपी जयश्री मदनसिंह ठाकूर (मामिडवार) हिचा नियमित जामीन अर्ज नांदेडच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. स्वतःच्या मुलीने आई-वडिलांविरुद्ध दिलेल्या साक्षीमुळे आरोपीचा जामीन नाकारण्यात न्यायालयाची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रकरणाची पार्श्वभूमी: मृत सक्षम ताटे हा अनुसूचित जातीचा होता आणि त्याचे आरोपी जयश्री ठाकूर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या विवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. याच रागातून मुलीचे वडील आणि भावाने अन्य साथीदारांच्या मदतीने सक्षमवर गोळ्या झाडल्या, तसेच विटा आणि कौलांनी अत्यंत निर्घृणपणे मारहाण करून त्याची हत्या केली. या संपूर्ण हत्येचा कट रचण्यात आणि सहकाऱ्यांना चिथावणी देण्यात जयश्री ठाकूर यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. मुलीची साक्ष ठरली कळीचा मुद्दा: या प्रकरणात आरोपी जयश्री ठाकूर यांची मुलगी आंचल हिने नोंदवलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरला. आंचलने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आई-वडिलांनी आणि भावाने घरातच सक्षमला ठार मारण्याचा कट रचला होता. या कटाची अंमलबजावणी त्याच दिवशी करण्यात आली. तसेच, पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना सक्षमची हत्या करताना पाहिले आहे. न्यायालयाचे निरीक्षण: जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. टी. आगलावे यांनी नमूद केले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून यासाठी फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. आरोपीचा पती आणि मुलगा यांच्यावर तडीपारीचे आदेश असतानाही त्यांनी शहरात येऊन हा गुन्हा केला, हे तपासात समोर आले आहे. आरोपी जयश्री ठाकूर यांना जामीन दिल्यास त्या साक्षीदारांवर, विशेषतः स्वतःच्या मुलीवर दबाव आणण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याची दाट शक्यता आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील आर. एन. देशमुख यांनी बाजू मांडली. Kanthak Suryatal Post Views: 1,983 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आधी रातचा रील अवतार आणि जंतर-मंतरवर पेटलेली आग: मोदींच्या व्हिडिओने प्रश्न सुटणार का? रील विरुद्ध रिअल: पंतप्रधानांच्या नाईट व्हिडिओवर विरोधकांचा जोरदार प्रहार!