मालपाणी विद्यालयातील कर्मचारी नियुक्त्यांबाबत तक्रार; शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप नांदेड: येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील कर्मचारी नियुक्त्या आणि समायोजनाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आणि वेतन वसुलीची मागणी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, कर्जत (जिल्हा रायगड) येथील एक निवासी मूकबधिर विद्यालय बंद पडल्यामुळे तेथील कर्मचारी मुरलीधर पाटील आणि श्रीमती गंगाबाई कोटीवाले यांचे समायोजन नांदेड येथील मालपाणी विद्यालयात करण्यात आले होते. पाटील हे २००७ मध्ये विशेष शिक्षक म्हणून, तर श्रीमती कोटीवाले या २०१० मध्ये पती-पत्नी एकत्रिकरण लाभांतर्गत कनिष्ठ लिपिक म्हणून या शाळेत रुजू झाले होते. मात्र, या नियुक्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. १८ ऑगस्ट २००४ च्या शासन निर्णयानुसार, शाळेत कनिष्ठ लिपिक पद रिक्त नसतानाही शासनाची दिशाभूल करून हे पद भरण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे. तत्कालीन मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हे समायोजन बेकायदेशीरपणे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता कर्जत येथील ती मूळ शाळा पुन्हा सुरू झाली असल्याने (८ एप्रिल २०२२ च्या आदेशानुसार), या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर परत पाठवावे, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे. जर ही लिपिक नियुक्ती बेकायदेशीर आढळली, तर २०१० पासून आतापर्यंत अदा करण्यात आलेल्या सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांच्या पगाराची वसुली संबंधित दोषी कर्मचारी आणि तत्कालीन मुख्याध्यापकांकडून करावी, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. याच दरम्यान, शाळेतील इतर प्रशासकीय नोंदीनुसार २०१५ मध्ये किरण चंद्रकांत रामतिर्थे यांची कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती झाल्याचेही दिसून येते. या तक्रारीमुळे आता मालपाणी विद्यालयातील जुन्या नियुक्त्यांच्या चौकशीचे सावट निर्माण झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,089 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळला? जेव्हा प्रियांका गांधींनी भर संसदेबाहेर पत्रकारांची शाळा घेतली! आधी रातचा रील अवतार आणि जंतर-मंतरवर पेटलेली आग: मोदींच्या व्हिडिओने प्रश्न सुटणार का?