नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा गांजा पकडला असून या प्रकरणात १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जिल्ह्यात अवैध धंदे, गुन्हेगारी आणि अंतरराज्य तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलिसांकडून चंदासिंग कॉर्नर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.
नाकाबंदी दरम्यान देगलूरकडून नांदेडकडे येणारी मारुती कंपनीची डिझायर कार संशयास्पदरीत्या वेगाने येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून वाहन अडवले.
वाहनाची झडती घेतली असता कारच्या डिकीत पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये चिकट टेपने गुंडाळलेले बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये हिरव्या रंगाचा पाला व काड्या असलेला गांजा सापडला. तपासात हा गांजा तेलंगणा राज्यातील बोधन परिसरातून आणण्यात आल्याचे समोर आले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अकबर अहमद खान पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीतून इतर साथीदारांची नावे समोर आली. त्यात माधव विठ्ठल जाधव,अतुल कवडे,बालाजी कांबळे, शंकर ओमार,संतोष कारणेवाड,शेख शफी,शेख सादिक,मोहमद इसाक मोहमद युसूफ,मोहमद हमीद,लंगड तशू,नवाब,रौफ, संघर्ष पावले आणि २ अनोळखी अश्या एकूण १७ आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ४३३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान गांजासह वापरलेली कार असा एकूण १३.४० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, बापूराव चव्हाण, ज्ञानेश्वर मठवाड पोलीस अंमलदार समीर अहेमद,वसंत केंद्रे,कल्याणकर,शंकर माळगे,पवार,सिरमलवर,देवकत्ते आणि अनेक होमगार्ड यांनी सहभाग घेतला.
नांदेड जिल्ह्यातून होत असलेली अंतरराज्य अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
