शहाजी उमाप पथकाची बिलोलीत जबरदस्त कार्यवाही; ८ पोकलेन आणि ३६ हायवा गाड्या पकडल्या 

बिलोली जवळ सागरोळी घाटात अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

तीन अक्षरी आडनावाच्या तीन पोलिसांच्या वाळू धक्यांवर कार्यवाही 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शनिवारी पोलीस उप महानिरीक्षक  शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सगरोळी घाटात  रेती घाटावर छापा टाकत अवैध धंद्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला.

या कारवाईदरम्यान नदीपात्रातून ८ पोकलँड मशिनच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३६ हायवा गाड्या ताब्यात घेतल्या. विशेष म्हणजे, या गाड्यांमध्ये नियमानुसार तीन ब्रास वाळू वाहून नेण्याची क्षमता असताना, त्यांना अतिरिक्त पत्रे लावून पाच ब्रासपर्यंत वाळू वाहतूक करण्यासाठी बदल करण्यात आले होते. हा प्रकारही अवैध वाहतुकीत मोडतो.यासाठी विशेष पथकाने आरटीओ विभागाला सुद्धा मदतीला बोलावले आहे.

हा रेती घाट मंजीतसिंघ  नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. कायदेशीररित्या घाट खरेदी करून त्याच माध्यमातून अवैध उत्खनन व अवैध वाहतूक कशी केली जाते, याचे हे उदाहरण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार संजीव जिंकलवाड, कामाजी गवळी, प्रदीप खानसोळे, गणेश धुमाळ आदींचा समावेश होता. त्यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडली. दरम्यान, या प्रकरणाचा संबंध काही महिन्यांपूर्वी वास्तव न्यूज लाईव्हने प्रसिद्ध झालेल्या बातमीशी जोडला जात आहे. त्यावेळी तीन अक्षरी आडनावाच्या तीन पोलिसांनी मोठ्या रकमेत रेती घाट खरेदी केल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आजची कारवाई त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

तसेच, मनजीतसिंघकच्या वाळू घाटावरून जाणारी अवैध्य वाळू गाडी कोणी पोलीस अधिकारी किंवा पोलीस अंमलदाराने पकडलीच तर नांदेड पासून ३०० किलोमीटर दूर नोकरीसाठी असणारा तीन अक्षरी आडनावाचा पोलीस गाडी पकडणाऱ्या पोलिसाला फोन करतो आणि बरेच काही सांगतो. मग ती अवैध्य वाळू गाडी सोडवीच लागते. आरोपींकडून पकडलेल्या वाहनांची सुटका करण्यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांकडून फोन येत असल्याच्या चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहेत. सगळा हिशोब वर लावलेला आहे अशा प्रकारच्या बोलण्यामुळे या प्रकरणात मोठ्या स्तरावर संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पण शहाजी उमाप यांनी दाखवून दिले आहे की बस्स झाले आता.

या कारवाईतून अवैध वाळू व्यवसायाचे नवे पैलू समोर येण्याची शक्यता असून, अद्यापही अनेक ठिकाणी हा धंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहाजी उमाप यांनी अशा सर्व प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!