नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी महसूल विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ४५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. ९ जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोलिसांना असर्जन येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त छापा टाकला.
या कारवाईत दोन बोटी, तीन इंजिने, दहा तराफे तसेच सुमारे १२ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जप्त साहित्याचा एकूण अंदाजित किंमत ४५.१० लाख रुपये असून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी बोटी, तराफे व इतर साहित्य पंचनामा करून नदीपात्रात नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संतोष उर्फ लालू गाडे, बजरंग कुटे, कैलास कुटे (रा. असर्जन, ता. जि. नांदेड) तसेच दोन अनोळखी आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, अवैध वाहतूक, दारू, जुगार व गुटखा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.
