नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जबरी चोरीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड ग्रामीण व भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
नांदेड ग्रामीण घटना : दागिने लुटून आरोपी फरार
दि. 02 मार्च 2026 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास टापे चौक, बोंडार (ता. जि. नांदेड) येथे ही घटना घडली. फिर्यादी हे कुटुंबासह प्रवास करत असताना जेवणाचे पार्सलचे प्लास्टिक बाहेर फेकण्यासाठी गाडी थांबवली असता, दोन अनोळखी इसमांनी धाक दाखवून फिर्यादीच्या आई व मावशी यांच्या अंगावरील सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले व पसार झाले.
या प्रकरणी फिर्यादी मो. मोतासिम नय्यर (वय 25, रा. टी. पॅराडाईज कॉलनी, वळगाव, अमरावती) यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. क्र. 190/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि/ सुनील भिसे करीत आहेत.
भाग्यनगर घटना : सहा जणांकडून 40 हजारांची लूट
दि. 01 मार्च 2026 रोजी सायं. 4.30 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान गिताई नगर पावडेवाडी ते सायाळ रोड परिसरात फिर्यादी प्लॉट पाहण्यासाठी गेले असता, सहा अनोळखी आरोपींनी एकत्र येऊन धाक दाखवत फिर्यादीजवळील रोख 30 हजार रुपये व 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 40 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला.
या घटनेप्रकरणी फिर्यादी दशरथ हनुमंत हेंडगे (वय 27, रा. भेंडेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु. क्र. 119/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 310(2), 115(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींवर अटक कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विनोद देशमुख करीत आहेत.
दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नांदेड ग्रामीण व भाग्यनगर येथे जबरी चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास
