नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर परिसरातील ऑटो पॉईंटवर सायंकाळच्या वेळेत महिलांशी गैरवर्तणूक होत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. कामावरून घरी परतणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना काही ऑटो चालकांकडून महिलांशी अयोग्य वर्तन तसेच अवमानकारक बोलणे केले जात असल्याची तक्रार महिलांनी व्यक्त केली आहे.
शिवाजीनगर येथून श्रावस्ती नगर व आंबेडकर नगर परिसराकडे जाण्यासाठी दररोज अनेक महिला या ऑटो पॉईंटचा वापर करतात. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत काही चालक महिलांशी उद्धटपणे वागत असल्याचे महिलांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकारामुळे दोन समाजांमध्ये गैरसमज व तणाव निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित ऑटो थांबा हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असतानाही त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त किंवा नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याची नाराजी महिलांनी व्यक्त केली आहे.
परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, ऑटो चालकांवर नियंत्रण ठेवावे तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व महिलांकडून करण्यात येत आहे.
