नागरिकांचे म्हणणे आहे की, पालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या विभागात आणि ज्या कामासाठी झाली आहे, त्या ठिकाणीच त्यांनी नियमितपणे हजर राहणे आवश्यक आहे. रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आदी कामांमध्ये विलंब होत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही प्रभागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, पाणीपुरवठा विभागातील तक्रारींचे प्रलंबित काम, तसेच अभियांत्रिकी विभागातील विलंब यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “कर्मचारी जर नियुक्तीच्या ठिकाणीच उपलब्ध नसतील, तर सेवा सुरळीत कशा चालणार?” असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.अनेक कर्मचारी काही जणांच्या पाठिंब्यावर आपले मूळ पद वगळता दुसऱ्याच पदावर काम करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आयुक्त साहेबांनी तातडीने याकडे लक्ष देऊन चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजावर कडक देखरेख ठेवावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने पारदर्शकता राखून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
आता जनतेचे राज्य आले आहे मानपामध्ये अश्या परिस्थिती जनतेचं कामे महत्वाची असतांना नगरसेवकांच्या घरची कामे महत्वाची असा नवीन प्रश्न समोर येण्या अगोदर यावर कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे.दरम्यान, या प्रकरणी पालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि आयुक्तांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
