हस्सापूर (प्रतिनिधी)- नांदेड शहरालगत असलेल्या हस्सापूर गावाची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर बनली असून सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः “गटारगंगा” झाला आहे. हस्सापूर / नसरतपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत साई कॉलनी, जुने हस्सापूर, नवीन हस्सापूर तसेच नसरतपूर गावात सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत सदस्या शोभा नवनाथ काकडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी दिनांक 28 जून 2024 रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून 2 जुलै 2024 रोजी ग्रामपंचायत व गटविकास अधिकाऱ्यांना नाली बांधकाम व पाणी उपसा करण्याचे लेखी निर्देश दिले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून गावासाठी सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही प्रत्यक्षात समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत जबाबदारी निश्चित करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांना कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

