नागरिकांच्या तक्रारी ऐकून डीआयजी शहाजी उमाप यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश!

परभणीत जनसंवाद उपक्रम; १६ तक्रारदारांनी मांडल्या समस्या, ‘संवेदना’ पोर्टलवर होणार पाठपुरावा

परभणी (प्रतिनिधी) –  नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांचे जलद निराकरण करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी १९ नोव्हेंबर रोजी परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील १६ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज त्यांच्याकडे सादर केले.

पोलीस आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ व्हावा, नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण व्हावे तसेच पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे.

परभणी जिल्ह्याच्या पोलीस कामगिरीचा मासिक आढावा घेण्यासाठी शहाजी उमाप हे बुधवारी सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. याच दौऱ्यादरम्यान दुपारी ३ ते ४.३० या वेळेत त्यांनी नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. यामध्ये मालमत्ताविषयक वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय आदी विषयांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता.प्राप्त झालेल्या सर्व १६ तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तक्रारींची तातडीने चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, तक्रारदारांच्या अर्जांवर प्रभावी आणि वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयामार्फत यापूर्वीच ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ‘जनसंवाद’ उपक्रमात प्राप्त झालेले सर्व अर्ज या पोर्टलवर नोंदवून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील स्वतंत्र फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे.यावेळी परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!