दसऱ्याच्या साफसफाईत सुसाईड नोट सापडल्याने खळबळ:आता पोलीस अधीक्षकां कडे विनवणी नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या मिसिंग प्रकरणावर पोलीस प्रशासन केवळ फाईल दाबून बसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. २४ मार्च २०२६ पासून गायब असलेल्या तरुणीचा मोबाईल चालू झाल्याचे सांगूनही पोलिसांनी सीडीआर (CDR) किंवा टॉवर लोकेशनचा तांत्रिक तपास करण्याचे साधे कष्टही घेतले नाहीत. आता दसऱ्यानिमित्त घरात साफसफाई करताना थेट सुसाईड नोटच हाती लागल्याने पोलिसांच्या ढिम्म कारभाराचे आणि बेकायदेशीर सावकारीचे वाभाडे निघाले आहेत. बहिणीचा शोध की पोलिसांची टाळाटाळ? तक्रारदार गणेश धोंडीबा बसवंते (वय ३६, रा. बालाजीनगर, नांदेड) यांची सख्खी बहीण कु. अनुसया धोंडीबा बसवंते ही २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता गांधीनगर येथील घरातून बँकेच्या कामासाठी बाहेर पडली आणि पुन्हा घरी परतलीच नाही. नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर २५ मार्च २०२६ रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. 0013/2026 दाखल करण्यात आली. मात्र, पोलीस ठाण्यात विचारणेसाठी जाणाऱ्या भावाला तपास अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे आणि टाळाटाळच मिळाली. मोबाईल सुरू झाला तरी तांत्रिक तपास शून्य ! काही दिवसांनी गायब असलेल्या अनुसया यांचा बंद असलेला मोबाईल अचानक सुरू झाला. आईच्या निदर्शनास ही बाब आल्यावर भावाने तातडीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.बहिणीचा मोबाईल चालू झाला असून त्याचे सीडीआर व टॉवर लोकेशनवरून तात्काळ शोध घ्यावा,अशी विनंती त्यांनी केली. परंतु, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारांनी या महत्त्वाच्या माहितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत तपासात पूर्णतः हलगर्जीपणा दाखवला. दसऱ्याच्या साफसफाईत फुटला बेकायदेशीर सावकारीचा भांडाफोड ! दरम्यान, दसऱ्याच्या निमित्ताने घरात साफसफाई करत असताना अनुसया यांच्या बॅगेत तिच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली. या चिठ्ठीतील मजकुराने प्रकरणाला धक्कादायक वळण दिले आहे. संतोष भय्या मुळे मला खूप मानसिक त्रास झाला. १,००,००० मी घेतले होते संतोष भैया कडून. १ लाख घेतले आणि ७५,००० हजार वापस केले, तरी आता १,००,००० एक लाख आहेत असे म्हणत आहे. म्हणून मला दोघे नवरा बायको खूप त्रास देत आहेत, म्हणून मला काही कळत नाही, मी जीवाला खूप कंटाळले. माझ्या चेकवर, बाँडवर सह्या दोघांनी घेतल्या. माझ्या जीवाचे काही झाले तर संतोष इंगळे आणि त्याची बायको जबाबदार असेल. कुमारी अनुसया धोंडीबा बसवंते या चिठ्ठीवरून संशयित आरोपी संतोष इंगळे व त्याची पत्नी यांनी १ लाखापैकी ७५ हजार रुपये परत मिळवूनही बेकायदेशीर सावकारीच्या व्याजासाठी जबरदस्तीने चेक व बाँडवर सह्या घेऊन प्रचंड मानसिक व शारीरिक छळ केल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधीक्षकांकडे धाव; निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिक पोलीस केवळ फाईलवर बसून राहिले आणि संशयितांची साधी चौकशीही केली नाही, यामुळे तक्रारदाराने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. या अर्जात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत: 1. तत्काळ FIR दाखल करा: संशयित आरोपी संतोष इंगळे व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) (आत्महत्येस प्रवृत्त करणे/अपहरण/धमकावणे) आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यान्वये एफआयआर (FIR) नोंदवावा. 2. फॉरेन्सिक तपास व ताबा: सुसाईड नोट हस्ताक्षराच्या तपासणीसाठी पाठवून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करावी. 3. निष्काळजी पोलिसांवर खातेनिहाय कारवाई: मोबाईल सुरू असल्याची माहिती देऊनही तांत्रिक तपास न करणाऱ्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या संबंधित अंमलदारांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी. 4. विशेष तपास पथक: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास इतर सक्षम व विशेष तपास अधिकाऱ्यांकडे सोपवून अनुसया यांचा तातडीने शोध घ्यावा. Kanthak Suryatal Post Views: 666 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन वाराणसीत समाजवादी पार्टीचा फडकवला झेंडा! पदवीधर मतदारसंघातही आशुतोष सिन्हांची ३,००० मतांची आघाडी!