नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धडक कारवाई करत विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ब्राह्मणवाडा शिवारात मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत २८ लाख १५ हजार रुपयांची साधनसामग्री आणि वाळू जप्त करण्यात आली आहे.

गोदावरी नदीपात्रातून सुरू होता अवैध उपसा दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजे ब्राह्मणवाडा ते पाथरड जाणाऱ्या रस्त्यालगत अवैध वाळूची साठवणूक केली जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता, गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळूचा उपसा करून ती तिथे साठवली जात असल्याचे उघडकीस आले. तसेच ही साठवलेली वाळू पोकलेनच्या साहाय्याने वाहनांमध्ये भरली जात असल्याचे निदर्शनास आले.

जप्त केलेला मुद्देमाल घटनास्थळावरून पोलीस पथकाने खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • १ पोकलेन मशीन
  • १ टिप्पर
  • ६० ब्रास वाळू

जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत २८ लाख १५ हजार रुपये आहे.

२ जणांवर गुन्हा दाखल या प्रकरणी २ इसमांवर कारवाई करण्यात आली असून, विमानतळ पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ५३८/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्ञानेश्वर माधव सोनटक्के आणि विठ्ठल बालाजी मोरे दोघे रा. ब्राह्मणवाडा या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३, ३ सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पथक पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

खबर हेल्पलाइनवरून माहिती देण्याचे आवाहन नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने खबर नावाची विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील कोणत्याही अवैध व्यवसायांची माहिती थेट ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!