नांदेड (प्रतिनिधी) – शाळा आणि प्रार्थना स्थळाच्याअवघ्या १०० मीटरच्या परिघात काळा धंदा मांडणाऱ्या माय-लेकाची हवा अखेर न्यायालयात काढण्यात आली आहे! नांदेडच्या अत्यंत गजबजलेल्या होळी सराफा परिसरातील चंद्रकांत प्लाझा येथे अवैध देहविक्रीचा व्यापार चालवणारी अक्का ऊर्फ दिपाली किशोर उदावंत (वय ५१) आणि तिचा ‘गिऱ्हाईक शोधणारा’ सुपुत्र तथा साथीदार नितीन किशोर उदावंत (वय ३०) या दोन्ही संशयितांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सोनवणे यांच्या न्यायालयाने तीन दिवसांचा पोलीस कोठडीचा प्रवास वाढवून दिला आहे. त्यामुळे आता या माय-लेकांचा मुक्काम पुन्हा एकदा पोलिसांच्या खास पाहुणचारात असणार आहे.या प्रकरणाचा तपास इतवारा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या कडे आहे.

शाळा-प्रार्थना स्थळाच्या सावलीत भरवला अनैतिक बाजार

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस अंमलदार अच्युत गोविंदराव मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा (गु.र.नं. ३५५/२०२६) दाखल करण्यात आला होता. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने चंद्रकांत प्लाझा येथील घर नंबर ०१९-०५९ वर बोगस गिऱ्हाईक पाठवून धाड टाकली. हा देहविक्रीचा अड्डा चालवला जात असलेले ठिकाण चौफळा भागातील शाळा आणि प्रार्थना स्थळाच्या  होळी या धार्मिक स्थळापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर होते. पैशांचे आमिष दाखवून निष्पाप व पीडित महिलांना जाळ्यात ओढायचे आणि या सार्वजनिक परिसरात अनैतिक मानवी व्यापाराची दुकाने चालवायची, असा हा गंभीर प्रकार सुरू होता.

अक्काचा कारभार अन् सुपुत्राची नेटवर्किंग स्किल!

पोलीस तपासात समोर आलेल्या हकिगतीनुसार, ५१ वर्षांची दिपाली उदावंत ही या अड्ड्याची मुख्य अक्का (वेश्या व्यवसाय चालवणारी) म्हणून संपूर्ण कारभार हाकत होती. तर तिचा ३० वर्षांचा मुलगा नितीन उदावंत हा शहरात हिंडून ग्राहकांना गळ घालण्याचे व गिऱ्हाईक शोधून आणण्याचे महत्त्वाचे काम बजावत होता. धाडीदरम्यान पोलिसांनी ५०० रुपयांच्या २ नोटा (१००० रुपये रोख), निरोध आणि तब्बल ४ महागडे टचस्क्रीन मोबाईल (व्हाइवो आणि ओप्पो कंपनीचे) असा एकूण ७३,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गळ्यात चार-चार मोबाईल अडकवून ऑनलाइन नेटवर्किंग करणाऱ्या या जोडीचा बुरखा अखेर टरकावला गेला आहे.

सराईत गुन्हेगार अन् जुनाच इतिहास

न्यायालयात सरकारी पक्षातर्फे पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी भक्कम मुद्दे मांडण्यात आले. कारण हे दोघे काही नवशिक्ये नाहीत! यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध त्यांच्या राहत्या घरी देहविक्री चालवून दहशत निर्माण केल्याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी (OMCA No. 653/2025) दाखल केल्या होत्या. शिवाय आरोपी नितीन उदावंत याच्यावर इतवारा पोलिसांत मारहाणीचे व धमकावण्याचे गुन्हे (गु.र.नं. २३/२०२६) आधीच नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणात इतरही अनेक पीडित महिलांची फसवणूक व मानवी तस्करी झाली असण्याची शक्यता असून, भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १४३(३) यांसारखी गंभीर कलमे वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस कोठडीचा मुक्काम वाढला!

प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सोनवणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, गुन्ह्याची मोठी व्याप्ती आणि सखोल तपासाची गरज लक्षात घेऊन आरोपी दिपाली उदावंत आणि नितीन उदावंत यांच्या पोलीस कोठडीत आणखी ३ दिवसांची वाढ केली आहे. आता पुढील तीन दिवस खाकी वर्दीच्या छत्राखाली या अक्का आणि तिच्या ग्राहक प्रतिनिधीची कसून चौकशी होणार आहे. मोबाईलच्या स्क्रीनवरून चालणाऱ्या या काळ्या धंद्यात आणखी किती ‘बडे मासे’ अडकले आहेत, याचा पर्दाफाश इतवारा पोलीस आता कसा करतात, याकडे संपूर्ण नांदेडकरांचे लक्ष लागले आहे!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!