शहजाद भट्टी नेटवर्कच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांचे युवकांसह नागरिकांना आवाहन नांदेड (प्रतिनिधी) – सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधून त्यांना कथित देशविघातक कारवायांकडे वळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या संदेशांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वीही शहजाद भट्टी याच्याशी संबंधित नेटवर्कच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही तरुणांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली होती. अशा संपर्कांच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून देशविघातक कृत्यांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम अर्थात UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील संशयास्पद संपर्कांकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत पोलिसांना माहिती देणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. वैयक्तिक माहिती शेअर करू नका नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी, अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संदेशाला उत्तर देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ओळख पडताळून पाहावी. आपली वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील किंवा लोकेशन अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये. संशयास्पद लिंक उघडणे, अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या फाइल्स किंवा ॲप्स डाउनलोड करणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हिंसक किंवा बेकायदेशीर कृत्यांसाठी प्रवृत्त करणारे संदेश अथवा प्रस्ताव आल्यास त्यांच्याशी संवाद पुढे सुरू ठेवू नये. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नांदेड पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा. संपर्कात आलेल्या तरुणांनी घाबरू नये सोशल मीडियावरील अशा संशयास्पद संपर्कात आलेल्या किंवा कोणाच्या जाळ्यात अडकल्याची शंका असलेल्या तरुणांनी घाबरून न जाता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. वेळेवर माहिती मिळाल्यास संबंधितांना योग्य ती मदत करता येईल आणि कायद्यानुसार पुढील कारवाई करणे शक्य होईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी आवाहन केले आहे. सोशल मीडियाचा वापर करताना सतर्कता बाळगणे, अनोळखी व्यक्तींवर आंधळा विश्वास न ठेवणे आणि संशयास्पद बाबींची माहिती पोलिसांना देणे, हीच सुरक्षिततेची महत्त्वाची पावले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 14 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुठे बंद आहे हो वाळूचा कारभार? वजीराबादच्या हृदयातच वाळूचा खुला दरबार! नांदेडचा चंद्रकांत प्लाझा की देहविक्रीचा अड्डा? अक्का अन् तिच्या गिऱ्हाईक बहाद्दर लेकाला ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढली!