नांदेड – स्पर्धा परीक्षांसह विविध उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनलेल्या नांदेड शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोषक वातावरणासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वतः शहरातील शाळा, महाविद्यालये व गर्दीच्या संवेदनशील परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची बैठक व महत्त्वपूर्ण सूचना दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व प्रमुख खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस आणि क्लास व्यवस्थापनात उत्तम समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला असून संचालकांना खालील प्रमुख सूचना देण्यात आल्या: नाईट व्हिजन सीसीटीव्ही: क्लासचे प्रवेशद्वार, अंतर्गत आवार व समोरील रस्त्यावर उच्च क्षमतेचे नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन: क्लास सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत मुख्य रस्त्यांवर सायकली व दुचाकींमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था करणे. तक्रार पेटी व समन्वयक: विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी अंतर्गत तक्रार पेटी व समन्वयकाची नेमणूक करणे. संशयितांवर लक्ष: संशयास्पद किंवा टवाळखोर घटकांची माहिती तात्काळ व्हॉट्सॲप ग्रूपवर शेअर करणे किंवा पोलिसांशी संपर्क साधणे. उपस्थित कोचिंग क्लास संचालकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची ग्वाही दिली आहे. चार्ली पेट्रोलिंग व टवाळखोरांवर जागेवरच कारवाई शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात किंवा मुख्य रस्त्यांवर विनाकारण थांबणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या अथवा विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर चार्ली पथकामार्फत विशेष लक्ष ठेवले जात आहे. १ अधिकारी व ३२ अंमलदार असलेल्या या पथकाची सेवा सकाळी ०६:०० ते १०:०० आणि सायंकाळी १९:०० ते २४:०० या वेळेत सुरू असते. माहे सप्टेंबरमध्ये १२८ टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दामिनी पथक व प्रत्यक्ष संवाद नांदेड शहर व इतवारा दामिनी पथकातील प्रत्येकी १ अधिकारी व ३ महिला अंमलदार शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि जवळच्या सार्वजनिक उद्यानांमध्ये सतत गस्त घालत आहेत. केवळ गस्त न घालता हे पथक विद्यार्थिनींशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत आहे. मिशन समाधान आणि ऑपरेशन कवच मिशन समाधान: विद्यार्थिनी व पालकांसाठी क्यूआर कोड आधारित तक्रार नोंदणी प्रणाली आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. हे क्यूआर कोड शाळा, कॉलेज व क्लासेसच्या नोटीस बोर्डवर लावले आहेत. ऑपरेशन कवच: दामिनी, रोड सेफ्टी व चार्ली पथकांच्या संयुक्त सहकार्याने ऑपरेशन कवच अंतर्गत विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. अँटी थेफ्ट पेट्रोलिंग: चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बाजारपेठा, बँका, एटीएम आणि महामार्गांवर विशेष गस्त व रात्री नाकाबंदी केली जात आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व पालकांना कोणताही गैरप्रकार आढळल्यास न घाबरता तात्काळ डायल ११२ किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी सांगितले आहे. Kanthak Suryatal Post Views: 74 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डाळ काळी नाही, पूर्ण डाळच काळी! निवडणूक आयुक्तांचा अनुभव झिरो; सर्वोच्च न्यायालयात क्यू वॉरंटोचा महादणका!