नवी दिल्ली (प्रतिनिधी) – दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांच्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यातील संवेदनशीलतेचे आणि सौजन्याचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आंदोलनादरम्यान प्रचंड गर्दीत अडकलेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार इक्रा हसन यांना सुरक्षित मार्ग काढून देण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वतः पुढे येत त्यांची ढाल बनून मदत केली.

प्रचंड गर्दीत इक्रा हसन यांच्यासाठी बनले सुरक्षा कवच निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा नेणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३०० पेक्षा जास्त खासदारांना पोलिसांनी अडवल्यानंतर परिसरात प्रचंड गर्दी व गोंधळ निर्माण झाला होता. या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार इक्रा हसन यांच्याभोवती माध्यम प्रतिनिधी व आंदोलकांची मोठी गर्दी झाली होती. समोर बसलेले खासदार आणि मागून येणाऱ्या गर्दीमुळे इक्रा हसन यांना पुढे जाण्यासाठी रस्ता सापडत नव्हता. ही परिस्थिती लक्षात येताच राहुल गांधी मागे आले. त्यांनी इक्रा हसन यांच्या खांद्यावर हळुवार थाप मारून त्यांच्या कानात मार्गदर्शन केले आणि कोणत्या बाजूने जावे याचा इशारा केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वतः आपल्या दोन्ही हातांनी गर्दी मागे सारत इक्रा हसन यांच्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करून दिला. सुरक्षा रक्षक पोहोचण्यापूर्वीच राहुल गांधींनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलता मुळे इक्रा हसन गर्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडू शकल्या.

प्रियंका गांधी यांनाही केली मदत त्याच आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले. आंदोलनावेळी बॅरिकेडवर चढलेल्या प्रियंका गांधी यांना खाली उतरताना अडचण येत असल्याचे पाहून राहुल गांधी यांनी स्वतः गर्दीतून पुढे येत त्यांचा हात धरला आणि त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले.

संवेदनशील नेतृत्वाची सर्वत्र प्रशंसा केवळ भाषणांमधून महिला सन्मानाचा संदेश न देता, प्रत्यक्ष कृतीतून महिला सहकाऱ्यांचा आदर आणि रक्षण करण्याची राहुल गांधींची ही वृत्ती नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. विरोधी पक्षनेत्याची राजकीय भूमिका निभावतानाच त्यांनी दाखवलेल्या या सभ्य आणि संवेदनशील रूपामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!