नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील एकता नगर भागात २७ ऑगस्टच्या रात्री युवक आकाश दवणे याचा खून झाल्याच्या प्रकरणाचा तपास भाग्यनगर पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणात आकाशच्या आई सविता दवणे यांनी दिलेल्या तक्रारीत एकूण नऊ आरोपींची नावे नमूद करण्यात आली असून, त्यामध्ये दोन महिला आणि दोन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी आतापर्यंत अल्पवयीन बालकांसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन बालकांना नियमानुसार बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. तर या प्रकरणातील प्रौढ आरोपींपैकी नितीन लक्ष्मण सावते, कुणाल लक्ष्मण सावते आणि साहिल उर्फ चिक्या रमेश दुधमल या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले यांच्या कडे असून, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तपासाची पुढील कार्यवाही करीत आहेत. तपास पथकात पोलीस अंमलदार राजू घुले, गुट्टे, जावेद, पांचाळ आणि तारू यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.यांनी पकडलेल्या तिघांना आज न्यायालयात हजर केले. पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. हत्या प्रकरणातील नेमका घटनाक्रम, आरोपींची भूमिका, गुन्ह्यामागील कारण, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.पोलिसांचा युक्तिवाद आणि आरोपींच्या बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितीन सावते, कुणाल सावते आणि साहिल उर्फ चिक्या रमेश दुधमल या तिघाना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी कायस्थ यांनी आरोपींना ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील एकूण नऊ आरोपींपैकी पाच जण पोलिसांच्या ताब्यात असून, त्यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, आरोपींची पूर्वीपासून काही ओळख अथवा वाद होता का आणि गुन्ह्याच्या वेळी प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा उलगडा तपासातून होण्याची शक्यता आहे.आकाश दवणे यांच्या हत्येने एकता नगर परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना कायद्याच्या कक्षेत आणून घटनेचा संपूर्ण तपास करावा, अशी मागणी होत आहे. पोलिस तपासाची दिशा आणि पुढील चौकशीतून या हत्या प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,461 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिंगोलीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा रेल्वेसमोर दुर्दैवी अंत; बदलीनंतर अवघ्या दोन दिवसांत घटना, कारण अद्याप गुलदस्त्यात संविधान विरुद्ध आरएसएस-भाजप विचारसरणी: देशातील दलितांच्या स्वाभिमानावर होणाऱ्या आघातांचे विश्लेषण!