नांदेड(प्रतिनिधी)-दै. सम्राटच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘सम्राट गौरव पुरस्कार-२०२६’ ची घोषणा करण्यात आली असून, आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना ‘युवा समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि. ३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. बंटीभाऊ लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचारासाठी जाता यावे, यासाठी त्यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. अनाथ व निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठीही ते सातत्याने पुढाकार घेतात. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी स्वखर्चातून शहरातील विविध भागांत बोअरवेल करून दिल्या आहेत.
पावसाळ्यात गोदावरी नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बंटीभाऊ लांडगे यांनी तत्काळ धाव घेत अन्नदान तसेच धान्य किटचे वाटप केले. लॉकडाऊनच्या काळात मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून नागरिकांना मदतीचा हात दिला.
रमजान ईदच्या निमित्ताने सर्व धर्मगुरूंना एकत्रित करून सर्व धर्म समभाव असे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्याचे कार्यही त्यांच्या पुढाकारातून करण्यात येते. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नेतृत्वाखाली विविध देखाव्यांसह भव्य व लक्षवेधी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी, गरजूंची मदत, सामाजिक सलोखा आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय योगदान दिल्याची दखल घेत बंटीभाऊ लांडगे यांना ‘युवा समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
