नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील एकता नगर परिसरात गुरुवारी रात्री ३२ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. आकाश मिलिंद देवणे (वय ३२) असे मृत युवकाचे नाव आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आकाश दवणे यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. हल्ल्यादरम्यान त्यांची आई सविता आणि भाऊ महेश यांनी आकाशला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केल्याने दोघे जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात चार संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्येंजने, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. हल्ल्यामागील पूर्ववैमनस्य, वैयक्तिक वाद किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचाही तपास केला जात आहे.आकाश देवणे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. जखमी आई आणि भावाची प्रकृती व त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.चारही संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करून हत्येचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!