नांदेड/नायगाव (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नायगाव पोलिसांनी एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि साठवणूक करणाऱ्या एका इसमाच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी १,२४,८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा छापा नायगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की, मौजे रातोळी (ता. नायगाव) येथील निळकंठ भुजंगराव पाटील हा आपल्या राहत्या घरात छुप्या मार्गाने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी पोलीस पथकासह शासकीय वाहनाने मौजे रातोळी येथे जाऊन दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली असता हा अवैध साठा मिळून आला.
जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित पदार्थांचा तपशील: छाप्यादरम्यान पोलिसांनी घरातून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
१. सागर पान मसाला – ३२८ पाकिटे (किंमत ₹४५,९२०/-)
२. SR-1 सुगंधित तंबाखू – ३२८ पाकिटे (किंमत ₹४५,९२०/-)
३. केसरयुक्त विमल पान मसाला – १९० पाकिटे (किंमत ₹१९,९५०/-)
४. वि-१ तंबाखू – १९० पाकिटे (किंमत ₹८,५५०/-)
५. मुसाफिर पान मसाला – ३० पाकिटे (किंमत ₹३,६००/-) ६. M-४ रॉयल जाफराबादी जर्दा – ३० पाकिटे (किंमत ₹९००/-)
- एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹१,२४,८४०/-.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी ६० वर्षीय आरोपी निळकंठ भुजंगराव पाटील (रा. रातोळी, ता. नायगाव) याच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १८९/२०२६, कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ५९(१)(२) व नियम २०११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी सदर धडक कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल भगत, पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, तसेच पोलीस अंमलदार शिवशंकर शिंदे, शिंदे, पाटील आणि महिला अंमलदार वायकुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
