१९ लाख ८ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त; रोख रकमेसह २६ मोबाईल, चारचाकी व मोटारसायकली ताब्यात
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लातूर जिल्ह्यात मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण २६ आरोपींवर कारवाई करून १९ लाख ८ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस पथकाने २२ ऑगस्ट रोजी मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरूड बायपासवरील दत्त मंदिराच्या बाजूस असलेल्या रामेश्वर सबाजी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ३१ हजार ७४० रुपये रोख, १९ मोबाईल, दोन चारचाकी वाहने व दहा मोटारसायकली, असा एकूण १७ लाख ८१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १९ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार मधील आरोपी सौदागर बंकट दळवे,पिंटु लक्ष्मण कसबे,नागनाथ गुलाब गिरी,अशोक भोई पंडीत, बालाजी शंकर ईटकर,गंगाराम नारायण शेगर,बाळु व्यंकट मस्के,गणेश पांडुरंग अवगुणे,रसुल मुक्तार पठाण,बालाजी तुकाराम कांबळे,अविनाश राजेंद्र राठोड,अनिल विलास जाधव,हनुमंत चंद्रकांत मोरे,विष्णु गोपीनाथ आडे,गणेश महादेव गोरे,समाधान कडाप्पा साळुंके,माणिक रघुनाथ भांगे,विकास माणिक पवार,राहुल साहेबराव लांडगे,रामेश्वर सवाशे असे आहेत.

त्याचप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दयानंद कॉलेज गेट जवळील रोडलगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका बुकीवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी २० हजार ३९० रुपये रोख, ६० हजार रुपये किमतीचे सात मोबाईल आणि ४५ हजार ९०० रुपयांचे संगणक साहित्य, असा एकूण १ लाख २६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार कायदा व महाराष्ट्र राज्य लॉटरी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील आरोपींची नावे अशी आहेत, किशोर बापूराव गोपनपाळे,सिद्धेश सोनवणे, महावीर दिनकर सोनकांबळे,इमरान महबूब शेख,धम्मानंद शंकर सावंत,महादेव बाळू धोंडीराम गोमारे,चाचा खडप.
दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५२ हजार १३० रुपये रोख, २६ मोबाईल, दोन चारचाकी, दहा मोटारसायकली व संगणक साहित्य, असा एकूण १९ लाख ८ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक पंकज इंगळे,पोलीस अंमलदार प्रदीप यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या मोबाईल क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
