नांदेड –  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने सन 2025-26 या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येणार आहेत.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांचा गौरव करण्यासाठी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरावर एक व महसुली विभागातील प्रत्येकी एक असा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार व 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सन 2025-26 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह 25 सप्टेंबर 2026 पर्यंत तीन प्रतींत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!