समाज कल्याणकडून जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यशाळा 

नांदेड – जिल्ह्यात भारत सरकार शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि वसतिगृह प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.  शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित काम पाहणाऱ्या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेला उपस्थित राहावे. कार्यशाळेत अर्ज प्रक्रिया, येणाऱ्या अडचणी आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन  

मंगळवार 18 ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत तर याच दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत पीपल्स व सायन्स महाविद्यालय स्नेहनगर नांदेड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नांदेड, अर्धापूर येथील फक्त तालुका व जिल्हास्तरावरील महाविद्यालयांचा समावेश राहील.

बुधवार 19 ऑगस्ट रोजी नूतन महाविद्यालय उमरी येथे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद तालुक्यातील महाविद्यालयांचा समावेश राहील.

गुरूवार 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 यावेळेत दत्त कला व वाणिज्य महाविद्यालय हदगाव येथे हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील महाविद्यालय.

शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जनता कॉलेज नायगाव येथे नायगाव, मुखेड, देगलूर, बिलोली या तालुक्यातील महाविद्यालय.

सोमवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत सरस्वती महाविद्यालय किनवट येथे माहूर व किनवट तालुक्यातील महाविद्यालय.

मंगळवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत संत गाडगेबाबा महाविद्यालय लोहा येथे लोहा व कंधार तालुक्यातील महाविद्यालय.

मंगळवार 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत एमजीएम महाविद्यालय नांदेड येथे नांदेड मधील इतर सर्व महाविद्यालयांचा समावेश या कार्यशाळेसाठी राहील.

या योजनेंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षा मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना स्वाधार व वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियाबाबत विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा व नशामुक्त अभियान अंतर्गत शपथ अभियान देखील राबविण्यात येत असून वरील नमूद महाविद्यालयात आयोजित करण्यात येत आहे. सर्व महाविद्यालयमधील विद्यार्थी, संबंधित काम पाहणारे कर्मचारी यांनी वरील प्रमाणे उपस्थितीत रहावे. जेणेकरून या योजनेबाबत माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाहीत.

शासन निर्णय 26 डिसेंबर 2024 नुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाआयटी पोर्टलवर सन 2024-25 पासून महाराष्ट्र स्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय 1  नोहेंबर 2003 व 7 जुलै 2023 नुसार राबविण्यात येत आहे. स्वाधार योजनेंतर्गत वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जधारक विद्यार्थ्याना येणाऱ्या अडचणी तसेच सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.

स्वाधार व वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियाबाबत विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडचणी तसेच तालुकास्तरावरून कार्यालयात प्रत्येक विद्यार्थी समक्ष येणे शक्य नाही. त्यामुळे सदर बाबतीत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देणे व मार्गदर्शन करण्यासाठी आणि ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय महाविद्यालयाचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेस सर्व महाविद्यालय व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!