देशात १११ वा, महाराष्ट्रात ११ वा क्रमांक; राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेची दखल नांदेड – देशभरातील वैद्यकीय संस्थांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या IIRF Ranking 2026 मध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेडने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील वैद्यकीय संस्थांच्या क्रमवारीत महाविद्यालयाने १११ वा, तर महाराष्ट्रात ११ वा क्रमांक मिळविला आहे. ही कामगिरी नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. IIRF क्रमवारीमध्ये वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, संशोधन, शैक्षणिक वातावरण, प्रात्यक्षिक व क्लिनिकल प्रशिक्षण, रुग्णसेवा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध निकषांच्या आधारे संस्थांचे मूल्यांकन केले जाते. या निकषांमध्ये नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केलेली कामगिरी राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. मुंबई, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतील नामांकित वैद्यकीय संस्थांसोबत नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळविणे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासोबत मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवाही दिली जाते. विविध विभागांमार्फत तज्ज्ञ उपचार, निदान सुविधा आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाला यशाची जोड महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या दूरदृष्टीपूर्ण व गतिमान नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित विकासाच्या क्षेत्रात सातत्याने सकारात्मक वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देत शैक्षणिक, प्रशासकीय आणि रुग्णसेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षक, निवासी डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका, तंत्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ही कामगिरी कोणत्याही एका घटकाची नसून संपूर्ण महाविद्यालय व रुग्णालयाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय क्रमवारीतील या यशामुळे महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात राष्ट्रीय क्रमवारीत आणखी वरचे स्थान मिळविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कार्यक्षमता अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. देशातील आघाडीच्या वैद्यकीय संस्थांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 818 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड विभागात “ऑपरेशन यात्री सुरक्षा” आणि “ऑपरेशन अमानत” अंतर्गत उल्लेखनीय कार्य परवानगी नाही, मग बार सुरू कसा? महापालिकेच्या जागेवर कोपर स्काय बारचा रहस्यमय खेळ! आहे काय कोणी दमबाज प्रश्न विचारणारा विचारणारा