नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे (वय ३५ वर्षे) यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे,. नेमकी घटना काय? या प्रकरणातील २४ वर्षीय तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र करखेली येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वार्षिक कार्यमूल्यमापन अहवालावर अभिप्राय नोंदवून व स्वाक्षरी करून तो पुढील पुनर्विलोकनासाठी जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड यांना सादर करायचा होता. हे काम करण्यासाठी डॉ. सोमेश मोरे यांनी तक्रारदाराकडे ४००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीचा सापळा आणि कारवाई: तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र करखेली येथे या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान डॉ. मोरे यांनी तडजोडीअंती ३००० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथेच सापळा रचला आणि तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर डॉ. मोरे यांना ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया: याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. यांनी केली कारवाई: ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास मगर आणि त्यांच्या पथकाने (यशवंत दाबनवाड, राजेश राठोड, प्रकाश मामुलवार आणि श्याम गोरपल्ले) केली आहे,. नागरिकांना आवाहन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणताही लोकसेवक कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर त्यांनी विभागाच्या नांदेड कार्यालयाशी (नागार्जुन सागर बिल्डिंग, स्नेहनगर) किंवा ०२४६२-२५३५१२ या क्रमांकावर संपर्क साधावा. Kanthak Suryatal Post Views: 990 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सत्तेचे ढळते सिंहासन आणि GenZ सोबत आला आता Gen Alpha राजकारणाची पहाट मीडियाची विश्वासार्हता, सुप्रीम कोर्टाचा दिलासा आणि अल्पवयीन हक्कांचे हनन