दोन स्वतंत्र कारवायांत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल; दोन टिप्पर पोलिसांच्या ताब्यात नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुदखेड पोलिसांनी दोन स्वतंत्र ठिकाणी कारवाई करत तब्बल ४८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई मुदखेड तालुक्यातील मुगट पाटी रोडवर करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एमएच-२६ एडी-२३१५ क्रमांकाच्या टिप्परमधून अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत होती. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात अंदाजे दोन ब्रास रेती आढळली. या कारवाईत आठ लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि दहा हजार रुपये किमतीची रेती असा एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विठ्ठल भुंजगराव बोचरे (वय ४०, रा. पाथरड, ता. मुदखेड) आणि वाहनमालकाविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई रहाटी ते माळकौठा जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. एमएच-२६ एडी-१९१८ क्रमांकाच्या टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे पाच ब्रास रेती विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी चाळीस लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि २५ हजार रुपये किमतीची रेती असा एकूण ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संभाजी एकनाथ पवार (वय ३२, रा. आमदुरा, ता. मुदखेड) आणि वाहनमालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक गणेश कराड, पोलीस उपनिरीक्षक रमेश पुणेबोईनवाड, सुरेश जाधव तसेच पोलीस अंमलदार चव्हाण, शिंदे आणि सुकनवार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. अवैध रेती उत्खनन, रेती चोरी आणि विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी अवैध रेती वाहतुकीची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 300 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कंगना रणौत यांच्यावर एफआयआर होताच भाजपला आठवले अभिव्यक्ती स्वातंत्र्य; तर दुसरीकडे ६१,००० पोस्ट्सवर सेन्सॉरशिप?