हदगाव तालुक्यातील मारुती हनुमान मंदिर संस्थान येथे १५ जुलै रात्री ते १६ जुलै पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून त्यामधील सुमारे १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी मारोतराव तुकाराम पाटील (वय ८०, रा. शिवाजी चौक, हदगाव) यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 334(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/सुरकटे करीत आहेत.
दरम्यान, लोहा तालुक्यातील ठाणे पिंपळगाव येथील बालाजी मंदिरातही चोरीची घटना घडली. ११ जुलै रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील बालाजी देवाच्या मूर्तीवरील ३२ तोळे चांदीचे दागिने, अंदाजे ३३ हजार रुपये किमतीचे, चोरून नेले. या प्रकरणी गुणाजी गणपती ढगे (रा. ठाणे पिंपळगाव) यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 331(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ/तिडकेकरीत आहेत.
मंदिरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे. दोन्ही घटनांतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे
