नांदेड – सोशल मीडियावर हातात शस्त्र घेऊन फोटो टाकून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गावठी कट्टा सदृश लायटर व धारदार तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाला गुप्त माहिती मिळाली की, हनमंत उर्फ अविनाश किशन गजले (वय 23, रा. निळा, ता. लोहा, जि. नांदेड) हा आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर हातात शस्त्र घेऊन फोटो प्रसारित करून दहशत निर्माण करीत आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संशयिताची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा सदृश लायटर तसेच सुमारे 35 इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 1 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 870/2026 अन्वये भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू कल्याणकर तसेच गुन्हेशोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा सोशल मीडियावर शस्त्रांचे फोटो व व्हिडीओ प्रसारित करून दहशत निर्माण करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारची माहिती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नांदेड पोलिसांशी संपर्क साधावा. Kanthak Suryatal Post Views: 856 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हयातील व्यावसायीक वाद दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी महिला आरक्षण आणि दोन तृतीयांश बहुमतासाठी एनडीए सज्ज; रामदास आठवले