संघर्षाच्या झळा सोसल्या, तरी माणुसकी हरवू दिली नाही! तसनीम पटेल यांच्या संघर्षगाथेचे इंग्रजीत प्रकाशन; डॉ. भागवत यांच्याकडून कौतुक छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – आयुष्यात कितीही मोठा संघर्ष आणि दुःख वाट्याला आले, तरी माणसाने आपले माणूसपण जपले पाहिजे. संकटांमुळे मनात राग, द्वेष आणि कडवटपणा निर्माण होऊ न देता संवेदनशीलता आणि माणुसकी टिकवणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. लेखिका व प्राध्यापिका तसनीम पटेल यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित टॉर्चर्ड ट्रूथ या जीवनचरित्राच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयाच्या रुक्मिणी सभागृहात डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती डॉ. अंकुशराव कदम, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक इंद्रेश कुमार आणि सामाजिक कार्यकर्ते मेहताब खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसनीम पटेल यांनी आपल्या जीवनप्रवासावर आधारित भाळ आभाळ हे मूळ मराठी चरित्र लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रथम हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आला. याच इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. टॉर्चर्ड ट्रुथ या पुस्तकातून लेखिकेचा बालपणापासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास उलगडण्यात आला आहे. स्त्री म्हणून सहन करावा लागलेला अन्याय, आर्थिक अडचणी, सामाजिक अवहेलना आणि भेदभाव अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींशी झुंज देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि यशाचा मार्ग गाठला. संघर्षाच्या काळातही आत्मसन्मान, संवेदनशीलता आणि माणुसकी जपण्याचा त्यांचा प्रवास या चरित्रातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. पुस्तकातील प्रामाणिकपणाचे कौतुक करताना डॉ. भागवत म्हणाले की, मोठ्या संघर्षातून आणि दुःखातून जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात इतरांविषयी राग, द्वेष आणि उद्वेग निर्माण होऊ शकतो. मात्र, तसनीम पटेल यांच्या चरित्रात असा कडवटपणा दिसत नाही. त्यांनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही आपले माणूसपण टिकवून ठेवले, हीच या पुस्तकाची विशेष बाब आहे. धर्माविषयीची भूमिका स्पष्ट करताना डॉ. भागवत यांनी धर्म म्हणजे केवळ ‘रिलिजन’ नव्हे, असे सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मांडलेला सत्य आणि करुणेचा विचार हा प्रत्येकाच्या जगण्याचा आधार असला पाहिजे. भारताच्या मूल्यपरंपरा आणि संस्कारांचा उल्लेख करत त्यांनी आज जगाला भारताकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती डॉ. अंकुशराव कदम यांनी तसनीम पटेल यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करताना ‘कृष्णविवर’ ही उपमा दिली. पुस्तक वाचल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चार ओळी लिहिल्याचे सांगत ते म्हणाले की, आयुष्यात भोगलेले आणि भूतकाळात गेलेले दुःख कृष्णविवरासारखे असते. या पुस्तकातील जीवनप्रवास वाचताना भावनांना आवर घालणे कठीण होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. समीना पठाण बारगीर यांनी सूत्रसंचालन केले, तर अझर बारगीर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. Kanthak Suryatal Post Views: 180 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हवेत दहशत, समुद्रात अग्नी! अबू धाबी-तेल अवीव विमान माघारी फिरले; हॉर्मुझची सामुद्रधुणी बनली डेंजर झोन! वाहतूक शाखेत तोडीचा खेळ की कारवाईचा देखावा? बुलेटपासून मिक्सरपर्यंत चर्चेचा धुरळा!