सायाळ शिवारात लिंबगाव पोलिसांची धडक कारवाई; ६५ वर्षीय शेतकऱ्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा भोकर (प्रतिनिधी) – हळदीच्या पिकात आंतरपीक म्हणून अवैधरित्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना करणाऱ्या ६५ वर्षीय शेतकऱ्यावर लिंबगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. सायाळ शिवारातील शेतात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १२ किलो ६९५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, त्याची किंमत ६ लाख ३४ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी N-STOP : नशेला STOP, भविष्याला START! ही विशेष अमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी लिंबगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना सायाळ शिवारात एका इसमाने स्वतःच्या शेतात गांजाची अवैध लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठांची रीतसर परवानगी घेऊन राजपत्रित अधिकारी, दोन शासकीय पंच, फॉरेन्सिक सायन्स टीम, वजन-मापे तज्ज्ञ आणि छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत शेत गट क्रमांक २५९ मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी हळदीच्या पिकाच्या ओळींमधील सरीमध्ये गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी शेतात उपस्थित असलेल्या गोविंद किशनराव धुमाळ (वय ६५, व्यवसाय शेती, रा. सायाळ, ता. जि. नांदेड) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. संबंधित शेत स्वतः वहीती करत असून गांजाची लागवड केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलीस प्रेसनोटमध्ये नमूद आहे. पोलिसांनी एकूण १२ किलो ६९५ ग्रॅम गांजाची वनस्पती जप्त केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निजाम मुसा सदर यांच्या फिर्यादीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८५/२०२६, कलम ८(ब), २०(अ), २०(ब)(ii)(ब) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर (प्रभारी नांदेड ग्रामीण) जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत लिंबगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक निजाम मुसा सदर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोकले, पोलीस अंमलदार मांडवकर, मार्कुरवार, अतुल सातारे, प्रमोद मोरे, बालाजी तेलंग, व्यंकट जाधव, रतेश टाक, दीपक गदनमारे, मारोती दासरवाड आणि महिला पोलीस अंमलदार नेहल भाजीपाले यांनी सहभाग घेतला. अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा नांदेड जिल्हा पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 227 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमायतनगरमध्ये बार-रेस्टॉरंट फोडले; ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास