नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या वादाचा सूड घेण्याच्या उद्देशाने धनेगाव येथील पेट्रोल पंपावर इंदरजितसिंग बावरी यांच्यावर खंजराने हल्ला केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. बी. सोनवणे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ज्योती जगदिश बिगानिया हिला न्यायालयीन कोठडीत पाठविले, तर इतर ४ आरोपींना पुढील तपासासाठी तीन दिवसांची, म्हणजेच १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ही धक्कादायक घटना ८ ऑगस्ट रोजी घडली होती. संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा येथील रहिवासी इंदरजितसिंग बावरी हे त्यांच्या चुलत भावासोबत फायनान्सच्या कामानिमित्त धनेगाव येथील पेट्रोल पंपावर गेले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांच्यावर खंजराने हल्ला केला. या हल्ल्यात बावरी यांच्या पोटावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या.
या प्रकरणात दिलीप पुंडलिक डाकोरे (३३), कृष्णा दिगंबर बारोळे (२९), रणजीत ऊर्फ रंज्या चांदू सूर्यवंशी (२३), ज्योती जगदिश बिगानिया (४०), अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिघानिया (२७) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी आरोपींना यापूर्वी १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
आज पोलीस कोठडी संपल्या नंतर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी घेतलेली कडेकोट दक्षता चर्चेचा विषय ठरली. एफआयआरमध्ये नावे असलेल्या आरोपींची ओळख स्पष्ट असतानाही त्यांना तोंड बांधून, मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले.
विशेष म्हणजे, आरोपी न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी केली. उपस्थितांचीही विचारपूस करण्यात आली. जणू काही आरोपी न्यायालयात हजर करण्यासाठी नव्हे, तर एखाद्या अतिगोपनीय मोहीमेवरच आणले जात आहेत, अशा थाटात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला.
दरम्यान, पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने ज्योती बिगानिया हिला न्यायालयीन कोठडीत पाठविले, तर इतर ४ आरोपींना १८ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करीत आहेत.
संबंधित बातमी ..
इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरणात सहावा आरोपी अजय बिघानियाला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
