नांदेड (प्रतिनिधी) – स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि निवडणूक अर्जासाठी चक्क एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या जात प्रमाणपत्राचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? पांडण रोड परिसरातील रहिवासी तक्रारदार अब्दुल रशीद अब्दुल हबीब (६३) यांचा मुलगा मोहम्मद जकरिया हा नागपूर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. मोहम्मद जकरियाकडे मोमीन जातीचे वैध ओबीसी जात प्रमाणपत्र आहे. आरोपी आफिया नाज अब्दुल रशीद (काँग्रेस पक्षाच्या माजी उमेदवार) आणि तिचे पती काजी नाफे यांनी संगनमत करून मोहम्मद जकरियाच्या या वैध जात प्रमाणपत्राचा गैरवापर केला. स्वतःची जात वैधता सिद्ध करण्यासाठी आरोपींनी मोहम्मद जकरिया हा आफिया नाजचा सख्खा भाऊ असल्याचे खोटे भासवले. त्यासाठी त्यांनी मोहम्मद जकरियाच्या नावाचे बनावट व खोटी कागदपत्रे, वंशावळ आणि शपथपत्र तयार केले. या बनावट शपथपत्रावर जकरियाची खोटी स्वाक्षरी करून आणि त्याच्या आधार कार्डचा वापर करून जात पडताळणी समितीची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. असा झाला उलगडा हा सर्व प्रकार २१ जून २०२६ रोजी तक्रारदाराला सोशल मीडिया (फेसबुक) वरून समजला. आपल्या मुलाच्या नावाचा आणि कागदपत्रांचा असा अवैध वापर करून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अब्दुल रशीद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांची कारवाई अब्दुल रशीद यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी आफिया नाज अब्दुल रशीद, काजी नाफे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२८, ३३६(२), ३४०(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 779 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भारताची डळमळीत अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचे वाढते वर्चस्व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा