भोकर (प्रतिनिधी) – भोकर तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे दिवसाढवळ्या झालेल्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७ जून २०२६) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सोमठाणा व परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमठाणा येथील ज्ञानेश्वर विठ्ठल पोलवाड (वय २८ वर्षे) यांचा माळ सावरगाव–सोमठाणा तांडा रस्त्यावर खून करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर पोलवाड आणि हनमंतु रंगराव कोडगीरे यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात हनमंतु कोडगीरे यांनी ज्ञानेश्वर यांच्या डोक्यावर व शरीरावर मोठ्या दगडाने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. दगडाने गंभीर मारहाण झाल्याने ज्ञानेश्वर पोलवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील कार्यवाहीसाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या खूनप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर भोकर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) डी. एस. हाके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. आरोपीला तातडीने अटक करून घटनेमागील नेमके कारण शोधून काढण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. या घटनेमागे नेमके कोणते कारण होते, पूर्वीपासून कोणताही वाद होता का, अथवा अन्य कोणता मुद्दा यामागे आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेनंतर सोमठाणा व परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. एका तरुणाचा अशा निर्घृण पद्धतीने जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,556 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिवसा घरफोडी; १ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास दोन महिन्यांपूर्वी खून करून गाडलेले प्रेत मरखेल पोलिसांनी शोधले