शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून धक्कादायक खुलासा; एका क्रीममध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा तब्बल ४८ हजार पट पारा ३९ लाख ६९ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त; इतवारा पोलिसांच्या कारवाईला प्रयोगशाळेच्या अहवालाने दुजोरा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात Made in Pakistan असे लेबल असलेली बनावट सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी इतवारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या नमुन्यांची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यामध्ये मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेले पारा (Mercury) आणि आर्सेनिक (Arsenic) या विषारी धातूंचे घटक आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, एका सौंदर्यप्रसाधनातील पार्याचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा तब्बल ४८ हजार पट अधिक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ९ जुलै २०२६ रोजी इतवारा पोलीस ठाण्याच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत मन्नार गल्ली, बाफना चौक, इतवारा परिसरातील मे. अफरा कलेक्शन (अफराह टूर्स अँड ट्रॅव्हल्स) या दुकानावर छापा टाकला होता. यावेळी दुकानचालक मोहम्मद जियाउद्दीन मोहम्मद वाजिद (वय २५, रा. मन्नार गल्ली, सध्या हैदरबाग, देगलूर नाका, नांदेड) याच्याकडून विविध ब्रँडची Made in Pakistan असे उर्दू व इंग्रजी भाषेत लेबल असलेली एकूण ३९ लाख ६९ हजार ९४० रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, ३१८(४), औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियमातील कलम १८(सी), २७(२)(बी) तसेच विदेशी व्यापार अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जप्त केलेल्या मुद्देमालातून नमुने घेऊन ते अन्न व औषध प्रशासनाच्या शासकीय विश्लेषक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून, त्यातील निष्कर्ष चिंताजनक आहेत. क्रीममधील पार्याचे प्रमाण धोकादायक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, PARLEY 24K GOLD GLEAM BEAUTY CREAM या क्रीममध्ये पार्याचे प्रमाण तब्बल ४८ हजार ४५३.४४ PPM आढळले. सौंदर्यप्रसाधनांमध्ये पार्याची निर्धारित कमाल मर्यादा १ PPM असताना या क्रीममध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा ४८ हजार पट अधिक पारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच GOREE BEAUTY CREAM WITH LYCOPENE या क्रीममध्येही पार्याचे प्रमाण ६ हजार ९२४.९४ PPM आढळले असून, ते निर्धारित मर्यादेपेक्षा जवळपास सात हजार पट अधिक आहे. नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन अशा बनावट आणि अवैध सौंदर्यप्रसाधनांमधील पारा व आर्सेनिकसारखे विषारी घटक त्वचेमार्फत शरीरात शोषले जाऊन गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण करू शकतात. त्यामध्ये त्वचेचे आजार, किडनी निकामी होणे तसेच मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होण्याचा धोका असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ गोरेपणाच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधने खरेदी करू नयेत. उत्पादनाचे अधिकृत लेबल, उत्पादन परवाना क्रमांक (Mfg. Lic. No.) आणि दर्जा तपासूनच खरेदी करावी. विनापरवाना किंवा बनावट विदेशी वस्तूंची विक्री आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२४६२-२३४७२० या क्रमांकावर किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 172 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खाजगी सचिवांविरोधात शिवसेनेच्याच महिला पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार; जातिवाचक शिवीगाळ अन् मारहाणीचा गंभीर आरोप