नांदेड (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक कुमार कबाडी यांच्या बदली प्रकरणाने सध्या पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली आहे. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी दिलेल्या बदली आदेशामागे अनेकांच्या सहभागाचा आणि कथित अनियमिततेचा सूर उमटत असतानाच, केवळ दहा महिन्यांच्या बदलीचा आदेश मिळाल्याने कबड्डी यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे बदलीचे गणित नेमके कोणाच्या फायद्यासाठी मांडले गेले, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. याच धर्तीवर मागील महिन्यात नांदेड जिल्ह्यातही एक वेगळाच प्रयोग झाल्याची चर्चा आहे. तब्बल ५८ – ६० पोलिसांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणांहून हलवून ७० किलोमीटरपर्यंत दूर बदलीचे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे या बदल्यांचा गोपनीयतेचा असा बुरखा पांघरला गेला की अनेकांना याची माहितीच उशिरा मिळाली. सध्या सुमारे २० जणांची नावे समोर आली असली, तरी संपूर्ण यादी अजूनही गुप्त खजिन्या सारखीच असल्याचे बोलले जाते. मात्र खरी गंमत पुढे आहे. बदलीचे आदेश निघाले, पण काही कर्मचारी अद्याप नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. काहींना कार्यमुक्तही करण्यात आलेले नाही. मग आदेश कागदावरच राहिले की प्रत्यक्षातही अंमलात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्याही पेक्षा महत्वाचे असे की,अनेक जणांची नावे त्या गुप्त यादीत आलीच नाहीत. त्याचे काय कारण हे सुद्धा गुप्तच आहे. दरम्यान, अनेकांची बदली थेट पोलीस मुख्यालय, नांदेड येथे करण्यात आल्याची चर्चा आहे. आधीच मंजूर क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी मुख्यालयात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मग ७० किलोमीटरचे अंतर अचानक मुख्यालयाच्या दारात कसे संपले, हा प्रश्न आता अधिकच गडद झाला आहे. या सर्व बदल्यांमध्ये वरिष्ठ पातळीवरील शिफारशी, आवडते’ आणि नावडते विषय, तसेच काही प्रभावशाली व्यक्तींचा हस्तक्षेप होता का, याची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची फेरतपासणी होईल का, काहींना सूट का मिळाली आणि काहींना अद्याप कार्यमुक्त का केले गेले नाही, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यासच या बदली नाट्याचा खरा पडदा उघडणार आहे. सध्या मात्र पोलीस दलात बदली झाली की नाही? हा प्रश्नच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,394 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जुना मोंढा येथील व्यापारी कार्यालयातील गुन्ह्याचा वजीराबाद पोलिसांकडून आरोपीलापोलीस कोठडी मराठवाड्यात पावसाची संमिश्र स्थिती