रुग्णांच्या हतबलतेवर डल्ला मारणारी रुग्णालयांची दुकानदारी आता बंद! तुकाराम मुंढेंचा खासगी रुग्णालयांना थेट इशारा

मुंबई (प्रतिनिधी) – आजारी माणूस रुग्णालयात उपचारासाठी येतो तो जगण्याची आशा घेऊन, पण अनेक खासगी रुग्णालयांनी मात्र या हतबलतेचा फायदा घेत आपला औषधांचा ‘धंदा’ जोरात मांडला आहे. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्याच मालकीच्या किंवा संलग्नीत मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती करणाऱ्या या लुटारू वृत्तीला आता महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चाप लावला आहे.

कायद्याचा धाक नाही की माणुसकी? अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात न देता ती परस्पर स्वतःच्याच मेडिकल स्टोअरमध्ये पाठवतात. हा केवळ नियमभंग नसून अनुचित व्यापार प्रथा (Unfair Trade Practice) असल्याचे ताशेरे प्रशासनाने ओढले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार आरोग्य सेवा मिळणे हा मूलभूत अधिकार आहे, पण काही रुग्णालयांनी या अधिकारालाच आपल्या नफेखोरीच्या आड ओढले होते.

मुंढेंचा कडक डोस: आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, रुग्णाला त्याच्या आवडीच्या कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता यापुढे:

  • कोणत्याही रुग्णालयाला आपल्याच मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती करता येणार नाही.
  • डॉक्टरांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन रुग्णाच्या नातेवाईकांना देणे बंधनकारक आहे. ते नाकारणे किंवा दाबून ठेवणे हा गुन्हा ठरेल.
  • रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात मराठी आणि इंग्रजी भाषेत मोठा फलक लावणे अनिवार्य आहे, ज्यावर स्पष्ट लिहिले असावे की रुग्णांना या रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती नाही.

आता खैर नाही! रुग्णांच्या खिशातून पैसे ओरपण्यासाठी प्रिस्क्रिप्शन अडवून धरणाऱ्या किंवा सक्ती करणाऱ्या संस्थांविरुद्ध आता कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. प्रशासनाने सर्व विभागीय सह-आयुक्तांना यावर कडक लक्ष ठेवण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या या सक्तीच्या व्यापाराला आता पूर्णविराम मिळणार असून, रुग्णांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा हा आदेश म्हणजे रुग्णांची लूट करणाऱ्यांसाठी मोठी चपराक ठरली आहे.

पण मुढे साहेब काही रुग्णालयातील प्रिस्किप्शनच्या औषधी दुसऱ्या औषधी दुकानांवर मिळतच नाहीत. अश्या परिस्थितीत दुसरा दुकानदार तशीच दुसरी औषधें दिलीत तर डॉक्टर साहेब हि औषधी चांगली नाही असे सांगतात,अश्या परिस्थितीत रूग्णांनी काय करावे या बाबत सुद्धा काही कडक निर्देश नक्कीच द्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!