नांदेड (प्रतिनिधी)- जून महिना उजाडला की पालकांच्या उरात धडकी भरते. एकीकडे पावसाची ओढ आणि दुसरीकडे पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी अव्वाच्या सव्वा फी, यामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच नांदेडमधील काबरा नगर भागातील बिग बेअर हब या शाळेने नर्सरीच्या प्रवेशासाठी चक्क ४५,००० रुपये वार्षिक फीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कायद्याला वाटाण्याच्या अक्षता? मिळालेल्या माहितीनुसार, काबरा नगर येथील रहिवासी गौतम जैन हे आपल्या ३ वर्षांच्या मुलीच्या प्रवेशासाठी या शाळेत गेले असता, शाळेने ४५ हजार रुपयांच्या फीची मागणी केली. जेव्हा जैन यांनी या फी रचनेबाबत DFERC (जिल्हा शुल्क नियामक समिती) कडून मंजूर असलेल्या आदेशाची प्रत मागितली, तेव्हा शाळेने अशी कोणतीही मंजुरी नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (maharashtrafre.org) औरंगाबाद विभाग अंतर्गत नांदेडमध्ये बिग बेअर हब या नावाने कोणतीही मंजूर फी यादी उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. पालकांची तक्रार आणि कारवाईची मागणी शाळेचा हा मनमानी कारभार महाराष्ट्र खाजगी शैक्षणिक संस्था फी नियमन अधिनियम २०११ मधील कलम ४ आणि ६ चे थेट उल्लंघन करणारा आहे. या लुटमारीच्या विरोधात गौतम जैन यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. नांदेड) आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीतील प्रमुख मागण्या: बिग बेअर हब शाळेकडून या अवैध फी आकारणीबाबत तातडीने लेखी खुलासा घ्यावा. मंजुरीशिवाय आकारण्यात येणाऱ्या अवैध फीवर तात्काळ बंदी घालावी. शाळेने फी स्ट्रक्चर मंजूर करून ते नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावे. फी देण्यास नकार दिल्याने प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कलम १२ नुसार कठोर कारवाई करावी. एकूणच, शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यापारा मुळे पालकांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासन अशा शाळांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुन्या काळात शाळांना ज्ञानाची मंदिरे म्हटले जायचे, पण आजच्या घडीला या शाळा पालकांच्या खिशातून रक्त आटवून पैसे काढणारी केंद्रे बनली आहेत की काय, असा सवाल विचारला जात आहे.अश्या फी आकारणाऱ्या शाळा त्याच पालकासांसाठी असतात जे त्या शाळेने तयार केलेली फीस भरू शकतात. संबंधित व्हिडीओ .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-15-at-14.16.50.mp4 https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-15-at-14.15.14.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,148 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रुग्णांच्या हतबलतेवर डल्ला मारणारी रुग्णालयांची दुकानदारी आता बंद! तुकाराम मुंढेंचा खासगी रुग्णालयांना थेट इशारा रेल्वे सुरक्षा बलाची कार्यवाही