नांदेड – जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त शुक्रवार 12 जून रोजी कामगार विभागामार्फत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ कार्यालय परिसरातून करण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी कामगार विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रतिनिधी, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते तसेच इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विविध आस्थापना, हॉटेल्स, व्यावसायिक प्रतिष्ठाने व मॉल्स यांना भेटी देण्यात आल्या. बालकामगार न ठेवण्याबाबत संबंधित आस्थापनांकडून हमीपत्रे घेण्यात आली तसेच बालकामगार प्रतिबंधक संदेश असलेले स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली. अभियानादरम्यान ढवळे कॉर्नर परिसरातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार कामगार विभागाने पोलिस विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करून संबंधित अल्पवयीन मुलांची सुटका (Rescue) केली. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बालकामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा अधिनियम 2016 नुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात अथवा प्रक्रियेत कामावर ठेवणे दंडनीय गुन्हा आहे. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसायांमध्ये रोजगार देण्यास मनाई आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नियोक्त्यांवर कारावास व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कामगार विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालकामगार आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ कामगार विभाग, पोलिस विभाग किंवा संबंधित प्रशासनाला द्यावी. बालकामगारमुक्त समाज निर्मितीसाठी सर्व घटकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी नमूद केले. Kanthak Suryatal Post Views: 618 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जब वार्ता टूटी और मिसाइलें बोलीं वाशिमच्या मंगेश जाधवला आरपीएफने ठोकल्या बेड्या; नरखेड-काचेगुडा एक्सप्रेसमध्ये आग लावल्याचा ठपका