अवैध्य धंद्यां विरुद्ध सुरु असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान उस्माननगर पोलीस ठाण्याच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, लोहा तालुक्यातील मौजे चेली शिवारातील गोदावरी नदीपात्रात बोटींच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मोठ्या लोखंडी बोटी, एक छोटे इंजिन बोट फयबर व अंदाजे दहा ब्रास अवैध वाळू असा एकूण 40,33,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दिनेश दशरथ गाठे (रा. बिलालपुरी, ता. मुखेड) व विश्वनाथ सुलेमान अंबोकर (रा. खांदिवडी, ता. मुखेड) यांच्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 121/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच खाण व खनिज अधिनियम 1957 मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळके, एएसआय श्याम वडजे, पोलीस कर्मचारी गंगाधर चिंचे, बजरंग कल्लेवार, प्रकाश पेदवाड व माधव पवार यांनी पार पाडली. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सुरू असलेल्या मोहिमेमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
